रायगड : खासदार संभाजी छत्रपती यांनी अखेर रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
३४८ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी संभाजी छत्रपती यांनी आंदोलनाची घोषणा केली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारेही दिले. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच आम्ही आंदोलन करणार आहोत. १६ जून रोजी हा मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा करतानाच आधीचं आणि आजचं सरकार मराठा आरक्षणावर एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. तुम्ही खेळ सुरू केला आहे का? खेळ करू नका. मी संयमी आहे. त्याचा मला अभिमान आहे. तुम्ही माझा संयम पाहिला. आता संयमी राहणार नाही. आता काय होईल ते होईल. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी छत्रपती यांनी दिला.
लोकं नाराज झाले तरी चालतील. पण मी समाजाला वेठीस धरणार नाही. दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही. शिवभक्तांचा मला पाठिंबा आहे. तर काही शिवभक्त माझ्यावर नाराज आहेत. पण कोरोनाचं संकट असल्याने काहीच करता येत नाही. माझं काही चुकलं असेल तर मी दिलगीर आहे. आपण जगलो तर महाराजांचे विचार पुढे घेऊन जाऊ, असं संभाजी छत्रपती म्हणाले. मी राजकारणी नाही. राजकारण करत नाही. समाजावर अन्याय होत असेल तर न्याय देणं ही आमची भूमिका आहे. मराठा समाज वाईट परिस्थितीत आहे. त्यांच्यासाठी आवाज उठवायचा नाही का? सर्वांना आरक्षण आहे, मराठ्यांना नाही. मग मी आवाज उठवायचा नाही का? मराठा समाजावर अन्याय होत असेल तर सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
Read Also :
- ज्यांना काम नाही ते असेल रिकामे मुद्दे उकरून काढतात; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर पलटणार
- मी बोलल्यानंतरच एवढा गोंधळ कशाला; वडेट्टीवार यांनी केली नाराजी व्यक्त
- ‘नारायण राणे हे स्वत:च्या स्वार्थसाठी पक्ष बदलतात; तशी कारकीर्द संभाजीराजेंची नाही’
- ‘काँग्रेसला हद्दपार करण्याची भाषा करणाऱ्यांना महाराष्ट्रातून हद्दपार केले’
- ‘मोदींची हिटलरशी तुलना योग्य नाही, हिटलरच्या काळात जर्मनी आर्थिक महासत्ता बनला होता’