अयोध्या येथे निर्माण होणार्या प्रभू श्रीराम मंदिराच्या पवित्र कार्यासाठी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी,पुणे, महाराष्ट्रकडून कारसेवेच्या रूपात योगदानासाठी 21 कोटी रूपयांच्या धनराशीची मदत करण्यात येणार आहे अशी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य श्री गोविंददेव गिरी महाराज यांनी दिली
माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी,पुणे, एमआयटी आर्ट, डिझाइन अॅण्ड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, लोणी काळभोर,अंवंतिका विद्यापीठ, उज्जैन, मध्यप्रदेश, इंडिया इंटरनॅशनल मल्टिव्हरसिटी, पुणे आणि माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह येथील सुमारे 75 हजार विद्यार्थी, 5 हजार शिक्षक व इतर कर्मचारी यांच्या सहकार्यातून या पवित्र कामाच्या योगदानासाठी सुमारे 21 कोटी रूपयांच्या धनराशीची मदत करण्यात येईल
अयोध्या येथे भगवान श्रीराम मंदिर निर्मितीमध्ये संस्थेचा हातभार लागावा म्हणून श्रीराम मंदिरातील सुंदर गर्भगृहाची निर्मिती शुभ्रधवल व सर्वोत्तम गुणवत्तेच्या मकराना संगमरवरामध्ये संस्थेतर्फे केली जाणार आहे.
माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, इंडिया इंटरनॅशनल मल्टिव्हर्सिटीचे प्रमुख पद्मभूषण डॉ. विजय भटकर व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून ही राशी उभारण्यात येणार आहे.