मुंबई : कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाच्या धर्तीवर मराठवाडा ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माहिती दिली आहे, अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. अरविंदकुमार, पर्यटन संचालक श्री. दिलीप गावडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ग्रामविकास विभागामार्फत कोकणातील ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी दिली जातो. अशीच योजना मराठवाड्यासाठी राबविता येईल, असे अब्दुल सत्तार म्हणाले.
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अनेक ऐतिहासीक आणि पुरातन वास्तू, किल्ले, गुंफा, अभयारण्ये आदी पर्यटनस्थळे आहेत. याशिवाय कृषी आणि ग्रामीण पर्यटनालाही मराठवाड्यात मोठा वाव आहे. यातून मराठवाड्याच्या पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची क्षमता आहे. त्यामुळे येत्या काळात ग्रामविकास विभागामार्फत कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाच्या धर्तीवर मराठवाडा ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम राबविण्यात येईल. यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना सत्तार यांनी दिल्या.
पर्यटन विभागाच्या सहयोगातून मराठवाड्यातील ग्रामीण भागातील पर्यटनस्थळे सुनिश्चित करुन त्यांचा विकास करणे, तिथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामीण विकास विभागामार्फत निधीची उपलब्धता करुन देणे याबाबतही बैठकीत चर्चा झाली.