चित्रपट निर्मात्या अभिनेत्री आणि दिग्दर्शक प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे या 7 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभाग मध्ये प्रवेश करणार आहेत. पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ तसेच अनेक चित्रपट बॅकस्टेज कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी भरीव काम करण्याची त्यांची इच्छा आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात मार्केट यार्डातील ‘निसर्ग’ येथील पक्षाच्या कार्यालयात हा प्रवेश होणार आहे.
तसेच महविकासआघाडीतील प्रत्येक पक्ष ‘कला’ क्षेत्रातील व्यक्तींना विधान परिषदेत संधी देत आहे.नुकतीच मंगळवेढ्याचे लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ‘कला’ क्षेत्रातील कोणत्या कलावंतांला विधानपरिषद निवडणुकीत संधी मिळणार हा औत्सुक्याचा विषय झाला आहे.शिवसेनेकडून ही अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे लवकरच प्रवेश करणार आहेत
बेर्डे यांच्या समवेत अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, अभिनेते विनोद खेडकर, लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर, ज्येष्ठ सिने अभिनेत्री सुहासिनी देशपांडे कार्यकारी निर्माते संतोष साखरे, लेखक दिग्दर्शक अभिनेते डॉक्टर सुधीर निकम, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, हे सर्वजण राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागांमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील, यांनी या प्रवेशाबाबत आनंद व्यक्त केला असून बेर्डे यांनी त्यांच्या उद्दिष्टासाठी योग्य प्लॅटफॉर्म निवडला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.