महाराष्ट्रातल्या राजकारणातील दोन लोकप्रिय चेहरे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघांचा स्वभाव, कार्यशैली, राजकारणाची पद्धत सगळंच भिन्न आहे. पण तरीही या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जन्मतारीख एकच आहे – 22 जुलै हा दोघांचाही वाढदिवस.
गेल्या विधासभेच्या निवडणुकीत राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना या दोघांनी महाराष्ट्रात राजकीय भूकंप आणले होते. प्रत्येकाला ती सकाळ आठवते ज्या दिवशी अचानक पणे हे दोघे एकत्र आले. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाशी बंडखोरी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकत्र शपथ घेतलेल्या फडणवीस-पवारांच्या बाबतीत एक वेगळाच योगायोग पाहायला मिळाला. एकाच दिवशी वाढदिवस असलेल्या दोघांनी एकाच दिवशी शपथ घेतली, तर एकाच दिवशी राजीनामाही दिला.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजीनामा देण्याची नामुष्की आली आहे.
याआधी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे फडणवीस यांना देखील राजीनामा द्यावा लागेल असा अंदाज वर्तवला जात होता. तो खरा ठरत फडणवीसांनी बहुमत चाचणीत पराभव टाळण्यासाठी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली.
अशा प्रकारे एकाच दिवशी जन्मलेल्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या यांच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला तुलनात्मक आढावा.
घरातच राजकीय वारसा, काकांकडून प्रेरणा –
काका शरद पवार यांच्याकडून अजित पवारांना राजकीय वारसा मिळाला होताच. 1982 साली सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीपासून अजित पवारांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. अजित पवारांनी पहिली निवडणूक विधानसभेची नाही तर लोकसभेची लढवली होती. 1991 मध्ये ते बारामती मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले. मात्र त्यांची लोकसभेतील ही कारकीर्द सहा-आठ महिन्यांचीच ठरली.मात्र तेव्हापासून अजित पवार राज्यात कार्यरत राहिले तर 2009 पासून शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे या लोकसभेत बारामतीचं प्रतिनिधित्व करतात. राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे ही राष्ट्रवादी काँग्रेसची जणू अलिखित विभागणीच झाली आहे.1995 पासून अजित पवार विधानसभेत बारामती मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. सुधाकरराव नाईकांपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत, आघाडीच्या प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळात अजित पवारांनी मंत्रिपद भूषवले आहे.
नगरसेवक ते मुख्यमंत्री –
देवेंद्र यांनाही घरातून राजकारणाचा वारसा होता. त्यांचे वडील गंगाधर फडणवीस हे विधान परिषदेचे आमदार होते तर त्यांच्या काकू शोभा फडणवीस यासुद्धा आमदार होत्या. नितीन गडकरींनी देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात आणलं. 1992 साली ते नागपूरच्या राम नगर प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर पाचच वर्षात ते नागपूरचे सर्वांत तरुण महापौर बनले. 1999 पासून ते विधानसभेवर निवडून येत आहेत. अजित पवार सत्तेत असताना फडणवीस हे विरोधकांचा आक्रमक आवाज होते. अभ्यासू नेता अशी त्यांची प्रतिमा होती.महाराष्ट्रात भाजपमध्ये गडकरी-मुंडे असे गट पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. या संधीचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपनं 2014 साली विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या. महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी पक्षश्रेष्ठींची पहिली पसंती फडणवीसच ठरले. फडणवीस यांचं वैशिष्ट्य म्हणजे 1999 पासून ते आमदार म्हणून निवडून येत आहेत, मात्र ते कधीच मंत्री झाले नाहीत. कोणत्याही मंत्रिपदावर काम न करता ते थेट मुख्यमंत्रीच बनले.
अश्या या दोन दमदार मंत्र्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!