कोल्हापूर: उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यांच दरम्यान पवार यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांची न्यू पॅलेस येथे भेट घेतली आहे. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे हेदेखील उपस्थित होते. मागील काही दिवसापासून संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणावरुन आक्रमक भुमिका घेतल्याने, ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. त्यामुळे आता या भेटीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
अजित पवार आणि श्रीमंत शाहू छत्रपती यांची ही भेट नियोजित नव्हती. आज सकाळी अजित पवार अचानकपणे शाहू छत्रपती यांच्या भेटीसाठी न्यू पॅलेस येथे दाखल झाले. गेल्या पाऊणतापासून ही बैठक सुरु आहे. या बैठकीला मराठा समाजाचे काही नेतेही उपस्थित असल्याचे समजते. १६ जूनला कोल्हापुरातून मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीत काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षणासाठी नक्षलवाद्यांनी काढलं पत्रक,
गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारे पत्रक काढल्यानंतर आता मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठा समाजासाठी सहानुभूती दाखवल्याबद्दल मी तुमचा आदर करतो. पण तुम्ही शिवबांचे खरे वैचारिक वारसदार असाल तर मुख्य प्रवाहात सामील व्हा, असे आवाहन संभाजीराजे यांनी नक्षलवाद्यांना केले.