पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात शिवसेना-राष्ट्रवादीत नाराजी नाट्य असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, पाचही नगरसेवकांनी घरवापसी केली. या संपूर्ण प्रकरणावर अजित पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं.
सारथी संस्थेशी संबंधित बैठकीसाठी मंत्रालयात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगरच्या पारनेरमधील फोडाफोडीवर प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी संपूर्ण घटनाक्रम पत्रकारांना सांगितला.
अजित पवार म्हणाले, “”मी त्या दिवशी बारामतीत होतो. त्या दिवशी गर्दीत होतो. मी सगळ्यांना सांगत होतो की, काळजी घ्या. त्या गर्दीत काही वाहनं आली. तिथे नीलेश लंके तिथे आले. मी त्यांना विचारलं की, काय काम आहे. त्यावर लंके मला म्हणाले की, काही अपक्ष नगरसेवक आहेत, त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आहे. मी बाहेर आलो, त्यांच्या गळ्यात रुमाल टाकले आणि त्यानंतर कार्यक्रम झाला. मग मला नंतर कळालं की, ते शिवसेनेचे होते. मग ती त्यांना विचारलं, तेव्हा ते म्हणाले की, दादा ते भाजपात जाणार होते. त्यांचं म्हणणं होतं की राष्ट्रवादीनं घेतलं नाही, तर भाजपात जाणार. आम्ही माणसांची फोडाफोडी करत नाही. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये. काल मी नीलेश लंके यांना बोलावून घेतलं. त्यांना सांगितलं.
पक्षात अन्याय होत असल्याची भावना शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये होती. त्यावर तुमच्या समस्या तुमच्या पक्षप्रमुखांना सांगा. उद्धव ठाकरे त्या नक्कीच दूर करतील, असं आवाहन पाच नगरसेवकांना केलं. त्यानंतर त्यांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला आणि या सगळ्या गोष्टीवर पडदा पडला, असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या राजकारणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा होती. मात्र उद्धव ठाकरेंच्या मनात कोणतीही नाराजी नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं.