पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी १३ जुलैपासून १० दिवस कडकडीत लॉकडाउनची घोषणा केली आहे. मात्र या लॉकडाऊनमध्ये औद्योगिक कंपन्या सुरू ठेवण्याची मागणी भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश मांडगे यांनी केली आहे
कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आणि साखळी तोडण्यासाठी ‘लॉकडाउन’ करणे उचित आहे. पण, गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले औद्योगिक क्षेत्राचे अर्थ‘चक्र’ पुन्हा लॉकडाउन करुन बंद ठेवणे चिंताजनक आहे. या संकटामुळे उद्योग आणि कामगार समस्येच्या गर्तेत अडकणार आहेत. त्यामुळे लॉकडाउनमध्ये कंपन्या सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याकडे भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
दरम्यान, कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर देशभरात मार्चअखेरीस लॉकडाउन सुरू करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण औद्योगिक क्षेत्र ठप्प झाले. त्यावर अवलंबून असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांसह उद्योगांचे आर्थिक बजेट कोलमडले. तीन महिने उद्योग बंद होते. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील आयटी आणि अन्य तत्सम कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी तणावातून आत्महत्या केल्याच्या घटना समोर आहेत. यापुढे हे चित्र आणखी भयावह होणार आहे.
केंद्र सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेंतर्गत उद्योगांचे चाक पुन्हा सुरू करण्यासाठी मोठी तरतूद केली. त्याचा फायदा पुणे जिल्ह्यातील तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योगांना निश्चितपणे झाला. जुलैच्या सुरवातीला उद्योग क्षेत्राचे काम काहीप्रमाणात पूर्ववत होत आहे. मायगावी परतलेले कामगार पुन्हा कंपन्यांमध्ये दाखल होवू लागले आहे. उद्योगाचे चाक काहीअंशी सुरळीत होईल, अशी अशा असतानाच पुन्हा लॉकडाउन करुन १० दिवस ‘सक्तीचा बंद’ ठेवावा लागेल. परिणामी, लाखो कामगार आणि उद्योजक अडचणीत सापडणार आहेत. यासाठीच उद्योगांना लॉकडाउनमधून वगळावे, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.