विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमी सॊशल मीडियावर चर्चेत असतात विशेषतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कधी गाण्यांमुळे, तर कधी एखाद्या टिप्पणीमुळे – वक्तव्यामुळे त्या नेहमी प्रकाशझोतात होत्या. आणि आता खूप दिवसानंतर त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. एका फोटोमुळे त्या सध्या नेटीझन्सकडून ट्रोल होताना दिसत आहेत.
अमृता फडणवीस यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कम्युनिटी हेल्थ सर्व्हिस २०१९-२० अंतर्गत वर्कशॉपमध्ये अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या. वेबिनारच्या माध्यमातून त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधला तसेच समाजोपयोगी आरोग्य उपक्रमाची गरज आणि परिणाम याबाबत त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. या वेबिनारसंदर्भात अमृता फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट अपलोड केली.
या पोस्टमध्ये अमृता फडणवीस कॉम्प्युटरसमोर खुर्चीवर बसलेल्या दिसतात. मात्र फोटोच्या एका कोपऱ्यात दिसणाऱ्या कागदावर हलकसा मजकूर हाताने लिहिलेला दिसत आहे. याच मजकुरावरुन सध्या अमृता फडणवीस नेटिझन्सचं लक्ष्य ठरल्यात. अमृता फडणवीस यांचा फोटो झूम करून पाहिला, तर एका कागदावर ‘फोटो लेते रहो’ अशी सूचना लिहिलेली दिसते.