मुंबई : एकीकडे राज्यात करोना बाधित रुग्णांच्या आणि करोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. तसेच यामुळे निर्माण झालेल्या आरोग्य सुविधांच्या तुटवड्यामुळे राज्यात भयावह परिस्थिती पाहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे, राज्यात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी, राज्यातील महाविकास आघाडीतील आणि भाजपमधील प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभांना मोठी गर्दी होताना पहायला मिळत आहे. दरम्यान, आता हा प्रचारसभांचा झंझावात थंडावला असला, तरी प्रचारसभांसाठी राज्यातल्या मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी पंढरपुरात आपला तळ ठोकला होता.
यावेळी राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आणि विरोधकांकडून चंद्रभागेच्या वाळवंटात आरोप- प्रत्यारोपांचा आणि दाव्यांचा धुरळा उडवून दिलेला पाहायला मिळाला.
यात आघाडीवर होते ते राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि राज्याचे अर्थ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार. त्यांच्या डायलॉगबाजीने आणि भाषणाच्या शैलीने, तसेच विरोधकांवर केलेल्या टीका टिपण्णीने त्यांनी पंढरपूरच्या निवडणुकांचे मैदान अक्षरशः गाजवून सोडले. अशा अजित पवारांचा सध्या एक फोटो समाज माध्यमांवर प्रचंड प्रमाणात फिरत आहे.
हा फोटो आहे शिवसेना शाखेतला. त्यामध्ये, अजित पवार गॉगल लावून एकटेच खुर्चीवर बसल्याचे दिसत आहेत. हा फोटो प्रचाराच्या शेवटच्या दिवशीचा म्हणजे १५ एप्रिलचा असून, यावेळी ते मंगळवेढ्यातील शिवसेनेच्या शाखेत गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील पक्ष कार्यालयात खाली कार्यकर्त्यांसह बैठक मारून बसल्याचे दिसून येत आहे.
सध्या भाजपच्या तिकीटावर लढणारे समाधान आवताडे आधी शिवेसेनेत होते. त्यांनी सेनेची मंगळवेढ्यात चांगली बांधणी केली होती. मात्र, सध्या ते याच मतदारसंघातून भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी थेट शिवसेना संपर्क कार्यालयात जाऊन बैठक घेतली. त्यावेळी तिथल्या एका कार्यकर्त्याने काढलेला अजित पवारांचा हा फोटो सध्या समाज माध्यमांवर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मतदारसंघातील रिक्त जागेवर पोट निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे, महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यात थेट लढत होणार आहे.