लॉकडाऊनच्या काळात सामान्य माणूस आपल्या आईच्या अंत्यसंस्कारालाही पोहचू शकत नव्हता. तेव्हा अशा पार्ट्या कोणाच्या आशीर्वादाने सुरु होत्या? मंत्र्यांच्या? असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी एक ट्वीट करून उपस्थित केला आहे.
‘सुशांत सर बेशुद्ध अवस्थेमध्ये खाली असणाऱ्या खोलीमध्ये असायचे तेव्हा वरच्या मजल्यावरील खोलीत पार्टी सुरू असायची. या बड्या पार्टींचं आयोजन रिया मॅम करायच्या ज्यामध्ये त्यांची आई, भाऊ आणि मित्र येत असत’, असा गौप्यस्फोट सुशांतच्या बॉडीगार्डनं केला आहे त्यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार आशिष शेलार म्हणाले की, सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात वारंवार सेलिब्रिटी पार्ट्यांचा उल्लेख होत आहे. जेव्हा लॉकडाऊनमध्ये सामान्य माणूस आपल्या आईच्या अंत्यसंस्काराला ही पोहचू शकत नव्हता तेव्हा अशा पार्ट्या कोणाच्या आशीर्वादाने सुरु होत्या? मंत्र्यांच्या? अधिकाऱ्यांच्या? असा सवाल करत आशिष शेलार यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर ही आत्महत्या असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले होते. मात्र, सुशांतचे वडील केके सिंह यांनी याप्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. बिहार पोलीस मुंबईत चौकशी करत आहेत. ते एका वेगळ्या अँगलने याप्रकरणाचा तपास करत आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या बॉडीगार्डने रिया चक्रवर्तीवर करण्यात आलेल्या सर्व आरोपांबाबत त्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्याने काही धक्कादायक वक्तव्य याप्रकरणाबाबत केली आहेत.