काँग्रेसने बंडखोर सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली. यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया आली आहे. भाजपचे नेते शाहनवाज हुसेन यांनी काँग्रेसवर सचिन पायलट यांचा अपमान केल्याचा आरोप केला. तसेच अशोक गहलोत जास्त दिवस मुख्यमंत्रिपदावर राहणार नाहीत, असा सूचक इशाराही दिला
शाहनवाज हुसेन म्हणाले, “काँग्रेसने सचिन पायलट यांचा अपमान केलाय. एक षडयंत्र आखून त्यांना उपमुख्यमंत्रिपदावरुन हटवण्यात आलं आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसकडे बहुमत नाही. आता अशोक गहलोत जास्त दिवस मुख्यमंत्री राहणार नाहीत.”
“हे भांडण अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील नाही. तर ही लढाई राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासमोर दुसरं प्रतिभावान नेतृत्व उभं राहू नये यासाठी आहे. राजस्थानमधील निवडणुकीत मेहनत सचिन पायलट यांनी केली, मात्र मुख्यमंत्रिपद अशोक गहलोत यांना देण्यात आलं. सचिन पायलट यांचा वारंवार अपमान करण्यात आला,” असं मत शाहनवाज यांनी व्यक्त केलं.