पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये 5 ऑगस्टला अयोध्यामध्ये राममंदिर भूमिपूजनाचा ऐतिहासिक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला अनेक प्रमुख लोक उपस्थित राहणार असल्याने अयोध्यामधील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला जवळपास 3 तास उपस्थित राहतील असे सांगितले जात आहे.
12.30 वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरु होईल व हा कार्यक्रम 10 मिनिटे चालेल. सुरक्षेच्या दृष्टीने अयोध्या सील करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे देशभरात लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. याची देखील जोरदार तयार करण्यात आली असून, यावेळी 48 पेक्षा अधिक अत्याधुनिक कॅमेरे लावले जातील.
हे कॅमेरे दूरदर्शन आणि एएनआयचे आहेत. दोघांच्या हायटेक एचडीओबी व्हॅन उपस्थित आहेत. दूरदर्शन व एएनआयचे 100 पेक्षा जास्त सदस्य परिसरात असतील.
जन्मभूमी परिसरातील मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत विशेष पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील.