ट्विटरला सध्या #BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. ठाकरे सरकारची मुघल राजशी तुलना करणाऱ्या एका सोशल मीडिया युजरविरोधात मुंबईत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे. युवासेनेचे कायदेशीर सल्लागार धर्मेंद्र मिश्रा यांनी ट्विटर युजर समीत ठक्कर याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच #BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. पण यामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव चर्चेत का आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
समीत ठक्कर या युजर्सनं जून आणि जुलैमध्ये त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुघल राजशी तुलना केली होती. या ट्विटमध्ये त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख नव्या काळातील औरंगजेब असा केला असून आदित्य ठाकरे यांचा उल्लेख मोहम्मद शाह उर्फ बेबी पेंग्विन असा केला आहे. या सर्व घडामोडीनंतर ट्विटरवर हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे.
दरम्यान, पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर समीर ठक्कर याने आपली बाजू मांडताना, “आपण फक्त कठोर भाषेचा वापर केला असून हे असंवैधानिक नाही. जर माझी पोस्ट आक्षेपार्ह होती तर ट्विटने ती काढली का नाही ? सरकारवर टीका करण्याच्या माझ्या लोकशाही अधिकाराचा मी वापर केला आहे,” असं म्हटलं आहे.