पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये आज राममंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यासाठी अयोध्या सज्ज झाली असून, जयत्त तयारी करण्यात आली आहे. अनेक नेते या ऐतिहासिक दिनानिमित्ताने आपल्या जुन्या आठवणी, भावना व्यक्त करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या मंगलप्रसंगी बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते, असे म्हटले आहे. आता मनसेचे आणखी नेते बाळा नांदगावकर यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करत जून्या आठवणींना उजाळा दिला आहे.
बाळा नांदगावकर म्हणाले की, करोडो लोकांचे ,अनेक पिढ्यांचे स्वप्न आज प्रत्यक्षात येत आहे. परंतु हा दिवस येण्यामागे लाखो लोकांचा संघर्ष आहे, आणि मला अतिशय गर्वाने नमूद करावेसे वाटते की त्यात माझा ही खारीचा वाटा आहे.
त्यांनी सांगितले की, मुंबई महापालिकेचा नगरसेवक असतांना 1992 मधे बाळासाहेबांच्या आदेशाने आम्ही त्यावेळचे सहकारी नगरसेवक सुभाष कांता पाटील, दिगंबर कादंरकर, जयवंत परब, के पी नाईक, श्रीकांत सरमळकर,विलास अवचट,विश्वनाथ नेरुरकर, अनंत भोसले असे आम्ही सर्व कारसेवक म्हणून सामील झालो. प्रथम फैसाबाद येथे गेलो व तिथून बसने अयोध्या कडे मार्गस्थ झालो. अतिशय तंग असे वातावरण त्यावेळी होते, कोणत्याही क्षणी कुठूनही हल्ला होण्याची, पोलीसांचा गोळीबार होऊन जिव जाण्याची शक्यता ही त्यावेळी होती. परंतु एक अतिशय वेगळेच स्फूर्ति दायक वातावरण त्यावेळी होते व त्यासमोर ही मरणाची भिती आम्हाला कुठेही जाणवली नाही.
बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्याबाबत ते म्हणाले की, विवादित ढाचा पाडण्यात जे अग्रेसर होते त्यापैकी एक असण्याचे भाग्य मला लाभले, त्यामुळे राम मंदिर चे महत्त्व आमच्यासाठी काय आहे हे शब्दांत सांगणे कठीण. विवादित ढाचा जमीनदोस्त करून तेथून निघतांना ज्या विटा तिथे मंदिरासाठी जमा झाल्या होत्या त्यातील 2 विटा आठवण म्हणून मी सोबत घेऊन निघालो. काही काळाने माझंगाव कोर्टाच्या बाजूला शिवसेनेच्या नवीन कार्यालयाच्या पायाभरणीच्या वेळी त्या 2 विटा आम्ही तेथे ठेवल्या. आता तिथे सध्या शिवसेनेची शाखा आहे. आज हे सर्व आपणासमोर ठेवण्याचे कारण की ते म्हणतात ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसेच रामजन्मभूमीशी हे थेट “रक्ताचे” नाते असल्याने या भूमिपूजनाचे महत्त्व काही औरच आहे. मागे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावर राजसाहेब बोलले होते, की आज बाळासाहेब असायला हवे होते, खरंच अगदी तीच भावना आज सर्वांची आहे.