नवी दिल्ली : देशात कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. बेड्स, ऑक्सिजन, औषधांअभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या धक्कादायक घटना घडत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑक्सिजन पुरवठा करावा यासाठी एका हॉस्पिटलला थेट न्यायालयात जाण्याची वेळ आली आहे.
दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलनं दिल्ली उच्च न्यायालयात ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारतं, कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा, असे म्हटले आहे.
भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या, अन्यथा ऑक्सिजन अभावी हजारो जणांना प्राण गमवावे लागतील, असे दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला म्हटले आहे.
याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायाधीश विपीन संघी म्हणाले की, आज आपण मोठ्या संकटात आहोत. ऑक्सिजन अभावी आपण हजारो लोकांचे प्राण गमावू. तुम्ही मागे हटून, असे म्हणू शकत नाही की आमच्याकडे ऑक्सिजन नाही, त्यामुळे तुम्हाला मरावे लागेल. तुम्ही पुढे आले पाहिजे. उद्योगांकडून ऑक्सिजन घ्या. अशा स्थितीमध्ये ऑक्सिजन आयात होईपर्यंत उद्योग बंद ठेवावे लागत असतील, तर ते बंद ठेवा. लोकांना गमवू शकत नाही. ऑक्सिजनचा पुरवठा योग्य होण्यासाठी आत्तापर्यंत केंद्र सरकारने नेमकं केलं काय? असा सवाल देखील न्यायालयाने केला.