भुसावळ नगरपालिकेतील सत्ताधारी पक्ष भाजपचे नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर यांनी प्रशासन आणि नगराध्यक्ष यांच्याशी वारंवारचर्चा करून देखील विकासकामे होत नसल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच त्यांच्या प्रभागात विकास कामे करून देणाऱ्याला मोबदल्यात स्वतःची किडनी देईल असे म्हटले आहे.
नागरिकांना शुद्ध पाणी आणि चांगले रस्ते देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे माझ्या प्रभागात जो कोणी विकास कामे करुन देईल त्याला मोबदल्यात मी किडनी देण्यास तयार आहे, असे नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर यांनी म्हटले आहे.
2016 साली पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला होता. भाजप नेते एकनाथ खडसे यांनी यावेळी प्रचार देखील केला होता.
ठाकूर म्हणाले की, भाजपने जाहीरनाम्यात जाहीर केलेल्या कामांपैकी 90 टक्के कामं झाल्याचा दावा महेंद्र सिंग ठाकूर यांनी केला आहे. मात्र, रस्ते आणि शुद्ध पाण्याचा प्रश्न तसाच प्रलंबित राहीला. मी वॉर्डात बऱ्याच व्यक्तींना शुद्ध पाणी पुरवण्याचा प्रयत्न केला. आता कोरोनाचं संकट आले आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमच्याजवळ सहा महिने वेळ होता. मात्र, तरीही आम्ही कामे करु शकलो नाहीत. आम्ही साधी मीटिंग घेऊ शकलो नाहीत. मी त्याअगोदरही अनेकवेळा रस्त्यांच्या कामासाठी वारंवार विषय मांडला; पण दखल घेतली नाही.