सामनाचे संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत तीन भागांमध्ये होणार आहे. आज या मुलाखतीचा पहिला भाग पार पडला. या भागात संजय राऊत यांनी १०५ आमदार असूनही भाजपाची सत्ता का आली नाही? हा प्रश्न विचारला.
भाजपाचं म्हणणं आहे की आमच्या १०५ जागा आल्या. मात्र त्या जागा त्यांना शिवसेनेच्या जोरावर मिळाल्या आहेत. ज्या शिवसेनेला ते विसरुन गेले. त्याचमुळे त्यांची सत्ता आली नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार म्हणतात “प्रमुख पक्ष प्रमुख कसा बनला याच्याही खोलात गेलं पाहिजे. भाजपाच्या ज्या १०५ जागा निवडून आल्या त्या जागांमागे शिवसेनेचं योगदान मोठं होतं. मात्र या योगदानाचा भाजपाला विसर पडला. तुम्ही शिवसेनेला बाजूला काढलंत. शिवसेना भाजपाच्या सोबत नसती तर १०५ ची संख्या कुठेतरी ४०-५० च्या आसपास असती. गेली काही वर्षे जो ट्रेंड बघायला मिळाला तोच ट्रेंड शिवसेना नसती तर भाजपाच्या जागांबद्दल बघायला मिळाला असता. त्यामुळे १०५ जागांबाबत जे भाजपाचे नेते सांगतात की आम्हाला सहकाऱ्यांनी दुर्लक्षित केलं. मात्र १०५ या संख्येपर्यंत भाजपा ज्यांच्यामुळे पोहचली त्यांनाच गृहित धरलं गेलं.”