मुंबई – महाविकास आघाडीच्या सरकारला आता वर्षपूर्ती होऊन गेली. या काळात भाजपाचे नेते आणि शिवसेनेचे नेते एकमेकांच्या पक्षातील नेत्यांवर टीका करण्याची एकही सोडत नसल्याचं प्रत्यक्ष दिसून आलं आहे. भाजपाचे राज्यातील नेते तर दररोज महाविकास आघाडी आणि विशेषत: शिवसेनेवर जहरी टीका करताना दिसतात. पण याचदरम्यान भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलावर कौतुकाचा वर्षाव केला.
महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाल्यानंतर आशिष शेलार यांनी सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या चुकीच्या वाटणाऱ्या धोरणांवर टीका केली. पण आज मात्र त्यांनी उद्धव यांचा धाकटा सुपुत्र तेजस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केल्याचं दिसून आलं. निसर्गातील जैवविविधतेवर संशोधन करणाऱ्या तेजस ठाकरे यांनी एक महत्त्वाचे सागरी संशोधन केले. त्यावरून शेलार यांनी त्याची पाठ थोपटली.
“उर्जावान तेजस ठाकरेंचे नवीन मत्स्यजीव शोधाकरिता अभिनंदन! करोनाकाळातही ते आपल्या कामाशी दृढपणे कटिबद्ध राहिले व आपल्या कामगिरीतून मत्स्यशास्त्रातील ज्ञानगंगेत भर पाडली, हे कौतुकास्पद! त्यांच्या नवीन वर्षातील वाटचालीस शुभेच्छा!”, असं ट्विट करत त्यांनी तेजस ठाकरेंचे कौतुक केले.
उर्जावान तेजस ठाकरेंचे नवीन मत्स्यजीव शोधाकरिता अभिनंदन ! करोनकाळात देखील ते आपल्या कामाशी दृढपणे कटिबद्ध राहिले व आपल्या कामगिरीतून मत्स्यशास्त्रातील ज्ञानगंगेत भर पढली , हे कौतुकास्पद ! त्यांच्या नवीन वर्षातील वाटचालीस शुभेच्छा ! pic.twitter.com/lr25ml56Yi
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 26, 2020