पिंपरी : शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी बुधवारी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे देखील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असतानाच आमदार जगताप यांनी ‘आगे आगे देखो होता है क्या’ असे ट्विट केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर आमदार जगताप यापुढेही विरोधी पक्षातील वजनदार नेत्यांना भाजपा मध्ये आणणर का अशी चर्चाही सुरू झाली आहे.
२०२२ च्या महापालिका निवडणुकासाठी 3 सदस्यांचा प्रभाग होणार; राज्य मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय
मुळात गजानन चिंचवडे हे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात. त्यांच्या पत्नी अश्विनी चिंचवडे या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका आहेत.त्यांना स्थायी समिती सदस्यपद न मिळाल्याच्या नाराजीतून गजानन चिंचवडे यांनी हा निर्णय घेतला असल्याचे जरी सांगितले जात असले तरी मुळात हा निर्णय भविष्यातील राजकीय घडामोडींचा विचार करून घेतला असण्याची जास्त शक्यता आहे.
शहर शिवसेनेमध्ये सध्या खासदार श्रीरंग बारणे आणि पालिकेतील गटनेता राहुल कलाटे यांचे गट आहेत. दोघांमधून विस्तवही जात नाही. या गटातटाच्या राजकारणात शिवसेना गुरफटली आहे. मध्यंतरी स्थायी समितीमधील सदस्यांची मुदत संपल्यानंतर नव्या सदस्यांची नियुक्ती करायची होती. त्यावेळी अश्विनी चिंचवडे या स्थायी समिती सदस्यपदासाठी इच्छुक होत्या. खासदार बारणे यांच्या मार्फत त्यांनी प्रयत्नही चालविले असल्याचे बोलले जात होते. मात्र प्रत्यक्षात स्थायी समिती सदस्य पदासाठी नामनिर्देशन करताना गटनेता राहुल कलाटे यांनी अन्य सदस्य यांचे नाव सुचवले. त्यामुळे गजानन चिंचवडे नाराज होते. या प्रकरणाचे पडसाद शिवसेनेत वरिष्ठ पातळीवर उमटले. कलाटे यांना गटनेते पदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले. परंतु त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या पदावर अन्य कोणाचीही नियुक्ती केली गेली नाही. दरम्यानच्या काळात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा शहरात दौरा झाला. त्यांनी शहर शिवसेनेमध्ये कोणतेही वाद नाहीत, महापालिका निवडणुकीत शिवसेना किमान पन्नास जागांवर निवडून येईल असे विधान केले होते. त्यामुळे पक्षांतर्गत वाद संपुष्टात आला असे वाटत असतानाच गजानन चिंचवडे यांच्या भाजपा प्रवेशामुळे शिवसेनेत अद्यापही सर्व काही आलबेल नाही हे स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि चिंचवडगावातील मोठे नेते मा. गजानन चिंचवडे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. राज्याचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. आगे आगे देखो होता है क्या…@BJP4Maharashtra @BJP4PuneCity @BJP4PCMC @BJYM4PCMC @Dev_Fadnavis pic.twitter.com/1xurq1IebX
— Laxman Jagtap (@iLaxmanJagtap) September 22, 2021
त्याचबरोबर गेले काही दिवस कमालीचे शांत आणि अस्वस्थ असलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांचा राजकीय करिष्मा अद्यापही संपलेला नाही ही बाब चिंचवडे यांच्या प्रवेशामुळे अधोरेखित झालेली आहे. जगताप यांचे राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य सर्वांशी निकटचे संबंध आहेत परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ते खास मर्जीतील आहेत. जगताप अशाच प्रकारे व्यूहरचना करून अन्य पक्षातील वजनदार कार्यकर्त्यांना भाजपामध्ये आणणार असतील तर ती अन्य पक्षांसाठी विशेषतः भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. आमदार जगताप यांनी केलेले हे ट्विट त्याचेच तर द्योतक नाही ना असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
Read Also :
- राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध करा: काँग्रेस नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
- भ्रष्टाचाराचे पुरावे असतील तर खुशाल तक्रार करावी; प्रवीण दरेकरांना इशाऱ्याला दादाचं रोखठोक उत्तर
- मुंबै बँकेत घोटाळा: अजित पवारांच्या जवळचे ६ संचालक सामील – प्रवीण दरेकांचा दावा
- किरीट सोमय्यांना रोखण्यासाठी ठाकरे सरकारचा ‘मास्टरप्लॅन’; भाजपच्या मुसक्या आवळणार?
- मुख्यमंत्री आणि पवार घराणं फक्त स्वत:च्याच मुलांचं करिअर घडवतात – विक्रांत पाटील