अहमदनगर: राजकीय भेटीचा सिलसिला चालू असतानाच, भाजपाचे माजी आमदार राम शिंदे यांची राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. पवार शिंदे भेटीची चर्चा कोढेही करण्यात आली नव्हती. दोन्ही नेत्याकडून त्यांच्या भेटीची गुप्ताता ठेवण्यात आल्याचे ही बोलले जात आहे. परंतू राम शिंदे यांनी अशी कोणतीही भेट झाल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर अजित पवार आणि राम शिंदे यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा झाली. ही भेट नक्की कशासाठी होती, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले जातात. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाच्यादृष्टीने अत्यंत महत्वाच्या घटना घडताना दिसत आहेत. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्यानिमित्ताने दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात नुकतीच मुंबईत झालेली भेटही चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळे आता अजित पवार आणि राम शिंदे यांच्या भेटीमागेही काही राजकारण आहे का, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
कोण आहेत राम शिंदे?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघात राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशी लढत झाली होती. फडणवीस सरकारच्या काळात मंत्री असलेले राम शिंदे हे भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. यामध्ये रोहित पवार यांचा विजय झाला होता.