शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले होते. आता यावरून पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. सोबतच राममंदिरच्या भूमिपूजनाच्या मुद्यावर देखील भाष्य केले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोना संपण्यासाठी जे मोदींनी केले ते जगात कोणीच केले नाही. 20 लाख 97 हजार कोटींचे पॅकेज दिले. ते दिल्यानंतर राममंदिर केले तर तुमच्या पोटात काय दुखले. राममंदिर ही आमची श्रद्धा आहे.
मुलाखतीविषयी चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी संजय राऊतांना सल्ला देईल की तीन दिवसांची मुलाखत घेऊन त्यांनी सामनाचा खप वाढवला. तशीच एक गेल्या 50 वर्षांच्या राजकीय जीवनामध्ये पवारांचे चढ-उतार यावर एक प्रामाणिक मुलाखत घ्यावी आणि ती देखील सामनामध्ये छापावी.