राजस्थानमधील सत्तासंघर्षाचे पडसाद आता महाराष्ट्रातील राजकारणातही बघायला मिळत आहे राजस्थानमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांशी संवाद वाढवण्यास सुरुवात केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत सत्तेतील घटक पक्षांशी संवाद वाढवा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्यानंतर राजस्थानमधील राजकीय घडामोडींनादेखील वेग आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आता सावध पवित्रा घेतला आहे.