मुंबई सारख्या शहरांमध्ये स्वतःच्या हक्काचे घर घेण्यास अनेक अडचणी येत आहेत. मुंबईत गेली अनेक वर्षे प्रयत्न करूनही पोलिस कर्मचाऱ्यांना हक्काची घरे उपलब्ध होताना अडथळे येत आहेत. मात्र आता सिडकोच्या माध्यमातून पोलिसांना साडेचार हजार घरे उपलब्ध झाली आहेत. पोलिसांसाठी असलेल्या 4,466 घरांच्या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सिडकोच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांसाठी विशेष बाब म्हणून घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. 27 जुलैपासून यासाठी ऑनलाईन नोंदणीला सुरूवात झाली आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पोलिस अविरतपणे दिवस-रात्र आपल्या जीवाची आणि पर्वा न करता आपल्या संरक्षणार्थ उभे असतात. अशा पोलिसांना हक्काचे आणि स्वप्नातले घर सिडकोच्या या गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे”
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खात्याचा कार्यभार हाती घेताच घेतलेल्या आढावा बैठकीत परवडणाऱ्या घरांच्या योजनांमध्ये पोलिसांसाठी देखील घरे राखीव ठेवण्याचे निर्देश दिले होते.