अभिनेता सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केले आहे.
विरोधी पक्ष इंटरपोल आणि नमस्ते ट्रम्पच्या समर्थकांना देखील चौकशीसाठी आणू शकतात. या प्रकरणावरून बिहार आणि महाराष्ट्रात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले, सुशांतसिंग राजपूत प्रकरणात विरोधक कदाचित इंटरपोल किंवा नमस्ते ट्रम्पचे कर्मचारी देखील तपासात आणू शकतात. देवेंद्र फडणवीस यांनी समजून घेतले पाहीजे की, हे तेच पोलीस आहेत ज्यांच्यासोबत त्यांनी मागचे पाच वर्ष काम केले आहे. हे तेच पोलीस आहेत ज्यांनी कोरोनाच्या काळात बहुमुल्य योगदान दिले आहे. पोलिसांवर बोट दाखवणाऱ्यांचा मी निषेध करतो. मुंबई पोलीस हे सक्षम आहेत. जर कुणाकडे पुरावे असतील तर त्याने ते पोलिसांसमोर ठेवावेत, गुन्हेगाराला शिक्षा देण्याचे काम आम्ही करु. कृपया या प्रकरणाचा वापर महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यात मतभेद निर्माण करण्यासाठी करु नका. जर कुणी यामध्ये राजकारण करु इच्छित असेल तर त्यासारखी वाईट गोष्ट नाही.