लॉकडाऊननंतर अनेक कलाकारांनी आपला नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. यादरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींची चर्चा सुरू आहे. तसं पाहता राहुल गांधी कायम आपल्या सोशल मीडियावरुन विविध व्हिडीओ शेअर करीत असतात.मात्र त्यांच्या या बदलेल्या लूकची चर्चा चांगलीच रंगल्याचे दिसत आहे.
राहुल गांधी व्हिडीओच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधताना वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतात. शुक्रवारी त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. त्यामधील राहुल यांचा लूक पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. व्हिडीओत राहुल यांचे केस काहीसे कुरळे दिसत होते. त्यांनी हाफ टीशर्ट परिधान केला होता. हाफ शर्ट आणि हलकेसे कुरळे केस पाहून लोकांना आश्चर्य वाटलं. या व्हिडीओमध्ये ते नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक आणि विदेश योजनांवरुन निशाणा साधत होते. त्या व्हिडीओमध्ये त्यांचा लूक वेगळा (कुरळे केस, चेहऱ्यावर दाढी) दिसत होता. विशेष म्हणजे या व्हिडीओच्या एक आठवड्यापूर्वी त्यांनी क्लीन शेव आणि छोट्या केसांमधला एक व्हिडीओ शेअर केला होता. आज तकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
राहुल यांच्या दोन लूकची तुलना करून अनेक जण सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करत आहेत. अवघ्या सात दिवसांत राहुल यांचा लूक इतका कसा बदलला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही जण हा राहुल यांचा जुना लूक असून व्हिडीओ आधी चित्रित झाल्याचा दावा केला आहे. राहुल यांच्या १० जुलै आणि १७ जुलैच्या व्हिडीओचे स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणात शेअर केले जात असून अवघ्या आठवड्याभरात लूक इतका कसा काय बदलू शकतो, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.