नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतरच महापौर निवडीच्यावेळी ठरलेल्या सुत्रानंतर 13 महिन्यानंतर महापौर संदीप जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दयाशंकर तिवारी महापौर राहतील असे सुत्र ठरलेले आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे महापौर पदासाठी दयाशंकर तिवारी यांनी तर उपमहापौर पदासाठी मनिषा धावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महापालिकेत 151 नगरसेवकांपैकी भाजपचे 108, काँग्रेस 29, बसपा 10, शिवसेना दोन, राष्ट्रवादी काँग्रेस एक व एक अपक्ष सदस्य आहे. मनपात भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने महापौर त्यांचाच होणार हे स्पष्ट आहे. असे असले तरीही दोन पदासाठी आठ उमेदवारांनी 16 अर्ज दाखल केले आहेत.
काँग्रेसच्या केवळ 29 नगरसेवक असतानाही मनोज गावंडे आणि रमेश पुणेकर यांनी महापौर पदासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजीची परंपरा पुन्हा एकदा समोर आली आहे. बसपातर्फे देखील महापौर पदासाठी नरेंद्र वालदे यांनी तर उपमहापौर पदासाठी वैशाली नारनवरे यांनी अर्ज दाखल केला.
दरम्यान, 13 महिन्यांच्या सुत्रानुसार नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि उपमहापौर मनीषा कोठे यांनी 21 डिसेंबरला पदाचा राजीनामा दिला होता.