मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर कोरोनाने धडक दिली आहे. उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांच्या दोघा सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच तेजस ठाकरे यांच्या इतर सुरक्षा रक्षकांचीही तातडीनं कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
तेजस ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लहान चिरंजीव असून त्यांना व्हाय प्लस सुरक्षा व्यवस्था आहे. त्यांच्या ताफ्यातील दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर इतर सुरक्षा रक्षकांची तातडीनं चाचणी करण्यात आली आहे. तसेच इतर सुरक्षा रक्षकांना तातडीनं क्वॉरंटाईनही करण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्र्यातील कलानगरस्थित असलेल्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्याआधी मातोश्रीबाहेरील चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली होती. तेथे मातोश्रीवर सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी चहा पिण्यासाठी जात होते. त्यामुळे चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच मातोश्रीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करत 14 दिवसासाठी क्वॉरंटाईन केले होते.