पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सर्वच रुग्णालये आणि खासगी हॉस्पिटल्स रुग्णांनी भरली आहेत. यामुळे कोरोना रुग्णांना वेळेवब बेड मिळत नाहीयेत. कोरोनाच्या अति गंभीर रुग्णांना रुग्णालयात बेड मिळावेत यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे समुपदेशन करुन त्यांना घरी पाठविण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी काढले आहे. खासगी रुग्णालयातही बेड उपलब्ध नसल्याने हा निर्णय घेण्यात आला.
पुण्यात लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांवर घरीच उपचार करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत. अशा रुग्णांचे समुपदेशन करुन घरीच उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत पुण्यातील खासगी रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर सूचना देण्यात आल्या. दरम्यान रुग्णालय प्रशासनाने नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाईचा इशाराही दिला.