मुंबई: मुंबईत झालेल्या क्रूझ अमली पदार्थ प्रकरणानंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे माझा मुलगा समीर वानखेडे याला लक्ष्य करत आहेत. तसेच ते ट्वीटच्या माध्यमातून आमच्या कुटुंबाविरोधात वारंवार निराधार आरोप करत आमची बदनामी करत आहेत, असा आरोप ज्ञानदेव यांनी मलिक यांच्याविरोधात सव्वाकोटी रुपयांच्या भरपाईचा दावा केला आहे.
एवढंच नाही तर दावा प्रलंबित असेपर्यंत मलिक यांना आमच्याविरोधात काहीही आक्षेपार्ह बोलण्यास मनाई करावी, असा तातडीचा अर्जही त्यांनी केला होता. याविषयी न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे मलिक यांनी प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करत सर्व काही कागदपत्रांच्या आधारावरच म्हटल्याचा दावा केल्यानंतर दिवाळी सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली आहे.
फ्लेचर पटेल याने समीर वानखेडे यांची बहीण जास्मिनसोबतचा ट्वीट केलेला फोटो आणि त्यात लेडी डॉन सिस्टर, असा केलेला उल्लेख याआधारे लेडी डॉन कौन? असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला होता. त्याचबरोबर ज्ञानदेव वानखेडे यांनी २०१५ साली दाऊद वानखेडे नावाने कथितरित्या अपडेट केलेले फेसबुक अकाऊंट, समीर वानखेडे यांनी अनुसूचित जातीचा लाभ मिळवत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मुस्लिम असल्याचे दाखवण्याकरिता मुंबई महापालिकेकडून समीर दाऊद वानखेडे या नावाने मिळवलेला कथित जन्मदाखला, अशा प्रकारची कागदपत्रे समोर आणून नवाब मलिक यांनी ट्विट केले होते.
हे सर्व खोटं आहे असे म्हणणे वानखेडे यांच्यातर्फे ऍड. अर्शद शेख यांनी मांडले होते. मात्र, तुमचा मुलगा (समीर वानखेडे) केवळ एक व्यक्ती नसून तो सरकारी सेवक आहे. त्यामुळे त्याच्या कृतींची तपासणी समाजातील लोकांपैकी कोणीही करू शकतो. त्यामुळे नवाब मलिक यांनी केलेले ट्वीट व जाहीर केलेली कागदपत्रे खोटी आहेत, हे तुम्ही प्रथमदर्शनी दाखवणे आवश्यक आहे. तरच अंतरिम दिलासाविषयी विचार करण्यात येईल असे न्यायमूर्तींनी शेख यांना सांगितले आहे त्यानंतर हा सर्व तपशील प्रतिज्ञापत्रावर सादर करू, अशी ग्वाही शेख यांनी दिली आहे.
तर मी नवाब मलिक हवेत काही म्हटलेले नाही. जे काही ट्वीट केले ते वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाऊंटवरील माहितीच्या आधारावरच केले. त्या कागदपत्रांची तपासणी खटल्याच्या वेळी तपासली जाऊ शकते, असा युक्तिवाद मलिक यांनी ज्येष्ठ वकील अतुल दामले यांच्यामार्फत केला आहे. शुक्रवारी आता या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.