पुणे : देशातील राष्ट्रपुरुष, तसेच राज्यातील पक्षांचे नेत्यांची समाज माध्यमांवर बदनामी केल्याप्रकरणी, सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठातील युवासेना उपाध्यक्ष आकाश शिंदे यांनी पुण्यातील सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून, पुणे शहरातील शिवसेना उपशहरप्रमुख किरळ साळी यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअप सारख्या समाज माध्यमांतून, अश्लील आणि बदनामीकारक शब्द वापरून, अवमान करणाऱ्यांविरोधात हा गुन्हा सायबर सेलकडे दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, यासंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये, “राजकारण महाराष्ट्राचे’ नावाच्या फेसबुक, इंटलेक्युअल फोरम या व्हॉट्सअप ग्रुपवर, कॉमेट बॉइज अॅण्ड गर्ल्स फेसबुक ग्रुप आणि सीएम देवेंद्र फडणवीस फॅन क्लब या फेसबुक पेज आणि ट्विटरसारख्या सामाजमाध्यमांवर सातत्याने शरद पवार, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यासारख्या घटनात्मक पदावर असणाऱ्या राजकीय व्यक्तींच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आणि त्यांचं चारित्र्य मलिन होईल अशापद्धतीचे फोटो पोस्ट करण्यात आल्याचं म्हटलं आहे.
तसेच, या नेत्यांचे हे मॉर्फ केलेले फोटो, अश्लील भाषेतला मजकूर वापरुन जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतूने पोस्ट करण्यात आले असून, राष्ट्रपुरुषांच्या नावाने बदनामीकारक मजकूर पोस्ट करुन सामाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार देखील यात केली आहे.
यासंदर्भात स्वरुप भोसले, नाना पंडीत, वैभव पाटील, महेश गहुडले, धनंजय जोशी, सोनाली राणे, जयसिंग मोहन, संदीप पाटील, शौर्यन चोरगे, अतुल आयचित, राजेंद्र पवार, राज पाटील, मुकेश जाधव, स्वरुप भोसले आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांविरोधात, पुणे सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर पोलीसचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके करत आहेत.