पिंपरी-चिंचवड : शहराच्या अल्पबचत सभागृहात, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामार्फत, पेठ क्रमांक 12, आकुर्डी इथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत विकसित करण्यात आलेल्या अत्यल्प उत्पन्न घटकांसाठी ३ हजार ११७ व अल्प उत्पन्न घटकांसाठी १ हजार ५६६ अश्या मिळून एकूण ४ हजार ८८३ सदनिकांसाठीची ऑनलाईन सोडत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.
यावेळी अजित पवार यांनी, ‘सरकारच्या माध्यमातून सामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात स्वतःच्या हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. हे उद्दिष्ट २०२२ पर्यंतपूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे नागरिकांनी या प्रकियेमध्ये सहभागी होऊन, योग्य त्या सूचना शासनाला द्याव्यात, या सूचनांची दखल घेऊन, त्या पद्धतीने या प्रक्रियेमध्ये आमच्याकडून सुधारणा करण्यात येतील, असे प्रतिपादन केले.
तसेच, ‘स्वत:च्या हक्काचं घर असावं, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यामुळे या सोडतीत ज्यांची ही इच्छा पूर्ण झाली नाही, त्यांनी निराश न होता, पुढच्या लॉटरी प्रक्रियेमध्ये पुन्हा अर्ज करावेत, त्यांचेही घराचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, असे सांगून, घरे उपलब्ध करुन देण्याची ही प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत असून, ती अत्यंत पारदर्शक आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या वशिलेबाजीला थारा नाही,” असे स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आणि पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांच्यासह संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच, कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांनी केले तर आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशाराणी पाटील यांनी केले.
Read Also :
- अरुण गवळीची दगडी चाळ होणार जमीनदोस्त! ‘डॅडी’ची दगडी चाळ इतिहासात जमा?
- अजित दादांचं असं झालयं… मेंढराचं नेतृत्व लांडग्याने करावं आणि लांडग्याकडून….
- म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा तुटवडा, राज्यात ब्लॅक फंगसचा धोका वाढला!
- मुख्यमंत्र्यांनी दिला गोरगरीब जनतेला दिलासा,राज्यात ४८ लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला नि:शुल्क जेवणाचा लाभ
- हेलिकॉप्टरमधून नाही तर जमिनीवरुन पाहणी करणार; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला