शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आज भाजपने केलेल्या दूध आंदोलनावरून सडकून टीका केली. ‘आज भाजप आणि विरोधीपक्ष केवळ राज्य सरकारविरोधात आंदोलन करत असतील तर हे पुतणा-मावशीचं प्रेम आहे’, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली होती. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजू शेट्टींवर पलटवार केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी राजू शेट्टी यांच्यावर सडकून टीका केली. राजू शेट्टी हे सरकारी आंदोलक आहेत. त्याची लुटूपुटूची लढाई केवळ सरकार वाचवण्यासाठी आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या अडचणीच्या काळात दूध उत्पादक शेतकरी हा दुधाच्या उत्पन्नावर जगतो आहे. ज्यावेळी दुधाचे दर कमी होतात त्यावेळी दर स्थिर करण्यासाठी सरकार अनुदान देतं. सध्या शेतकऱ्यांच्या दुधाला मिळणाऱ्या दरात गाईच्या चाऱ्याचा खर्चही निघत नाही. असं असतानाही सरकारकडून कुठलेही अनुदान मिळत नाही हे दुर्दैवी आहे. राजू शेट्टी लुटूपुटूची लढाई करत आहेत. ते सरकारमध्ये आहेत. त्यामुळे ही फक्त सरकार वाचवण्यासाठीची लढाई आहे. राजू शेट्टी सरकारी आंदोलक झाले आहेत.”