आरोप करणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे. फडणवीस फिरत आहेत, ही चांगली बाब आहे. कोरोनाशी मुकाबला करताना काही कमतरता त्यांना जाणवत असतील तर ती त्यांनी निदर्शनास आणून द्यावी. परंतु, ते मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या आपल्याच निर्णयाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप भुजबळांनी केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना, शासकीय अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहू नये, असा आदेश काढला होता. पण, आता त्यांनी स्वतःच्या आदेशाचे पालन करावे, असा टोला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लगावला.भुजबळ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे राज्याच्या विविध भागात दौरे सुरू आहेत. नाशिकच्या दौऱ्यात त्यांनी “कोरोना संसर्गा’च्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधताना महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला. तसेच शासकीय अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. त्यामुळे फडणवीस राज्यात समांतर सरकार चालवत असल्याचा आरोप करीत, शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. त्या अनुषंगाने तापलेल्या मुद्द्यावर भुजबळ म्हणाले, की आरोप करणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे.फडणवीस फिरत आहेत, ही चांगली बाब आहे. कोरोनाशी मुकाबला करताना काही कमतरता त्यांना जाणवत असतील तर ती त्यांनी निदर्शनास आणून द्यावी. परंतु, ते मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या आपल्याच निर्णयाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप भुजबळांनी केला.