आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये अयोध्यानगरीत राममंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यासाठी देशभरात तयारी करण्यात आली आहे. भाजपकडून देखील हा दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करावा, असे जनतेला आवाहन केले जात आहे. आता राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या ऐतिहासिक दिनानिमित्ताने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तिन्ही कारसेवांना उपस्थित राहता आले हे कारसेवक म्हणून माझे भाग्य असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी कारसेवा करतानाचे काही प्रसंग देखील सांगितले. 18 वर्षांचे असताना आपण पहिली कारसेवा केल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
एका प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, हिंदूंसाठी राम हे ईश्वर असतील, तर जे ईश्वराला मानत नाही अशांसाठी देखील प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. जीवनातील एक आदर्श त्यांनी आपल्यासमोर ठेवला आहे. याशिवाय ते म्हणाले की, भूमिपूजन होत असताना लोकांनी कोठेही संघर्ष करण्याची गरज नाही. आपआपल्या परीने आनंद साजरा करावा. कोरोनाचे सोशल डिस्टेंसिंग पाळून आनंद साजरा करा, असे आवाहन केले.