देशातील ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी आता जवळपास पूर्ण झाली आहे. उद्या सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. या भूमिपूजनाचा निम्मिताने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कारसेवेतील आठवणींना उजाळा दिला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांनी वयाच्या 20 व्या वर्षापासून प्रत्येक कारसेवेत सहभागी झाल्याचं आणि याचसाठी तुरुंग पाहिल्याचं सांगितलं. तसेच या काळात 3 अंश सेल्सिअस तापमानात झोपल्याचं आणि खांद्यावरुन गोळ्या जाताना पाहिल्याचंही त्यांनी नमूद केलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्यावेळी निकाल आला तेव्हा स्वप्नपूर्तीचा आनंद झाला. इतक्या वर्षांच्या संघर्षातनंतर यश आलं. जेथे प्रभू श्रीरामांचा जन्म झाला तेथे मंदिर होत आहे. उद्याचा सोहळा याची देही, याची डोळा पाहायला मिळाला याच्या इतका दुसरा मोठा आनंद नाही.
असा होता देवेंद्र फडणवीस यांचा कारसेवेबद्दलचा अनुभव –
फडणवीस म्हणाले,” मी वयाच्या 20 व्या वर्षी 30 सप्टेंबर 1989 ला पहिल्यांदा कारसेवेसाठी गेलो होतो. त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांना राम शिला पूजेचं यजमानपद घेण्यास सांगितलं होतं. तेव्हा अखिल भारतीय परिषदेचा गट घेऊन उत्तर प्रदेशमध्ये गेलो. आम्हाला देवरा बाबांकडून पुढील सुचना मिळणार होत्या. तेव्हा आम्ही आनंदभवन येथे नेहरुंच्या घराच्या लॉनवर बसलो.”
“आम्ही देवरा बाबांकडून माहिती घेतली. मंदिराकडे जाण्याचे सर्व मार्ग बंद असल्याचं सांगितलं. तसेच सत्याग्रह करत अटक द्यायची असं त्यांनी सांगितलं. तेव्हा मी मात्र अटक होऊन घेणार नाही असं सांगितलं. आम्ही एका बाबांच्या आश्रमात 5-6 दिवस राहिलो. तिथं 3 अंश सेल्सिअस तापमान असायचं. आम्ही शंकराचार्यांसोबत पायी निघालो. आम्हाला गंगेवरील एका पुलावर थांबवण्यात आलं. तेथे लाठीचार्ज झाला. शंकराचार्यांना अटक करण्यात आलं. तेव्हा खांद्यावरुन बंदुकीच्या गोळ्या जाताना पाहिलं. असं आधी कधी पाहिलं नव्हतं,”
“जवळपास 14-15 दिवस आम्ही बदायुच्या तुरुंगात होतो. तेथे आम्ही रामाचं नाम घ्यायचो आणि कैद्यांनाही रामाचं नाम घ्यायला लावायचो. आम्ही जेथे तुरुंगात होतो, त्या तुरुंगाच्या जेलरची दोन्ही मुलं कारसेवेसाठी गेले होते. त्यामुळे त्यांनाही आम्ही आल्याचा आनंद झाला. घरच्यांना प्रचंड काळजी वाटत होती. माझ्या पायाला गोळी लागली अशीही अफवा घरच्यांपर्यंत पोहचली. त्यामुळे घरचे अधिक काळजीत पडले होते.”