मुंबई : महाराष्टाचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. यानंतर तिन्ही नव्या मंत्र्यांचं मंत्रालयात जंगी स्वागत करण्यात आले. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारची पहिली कॅबिनेट बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कँबिनेट बैठकीत चंद्रकांत कुऱ्हाडे यांना पाच लाखांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांना ही मदत जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयात देखील पाट्या बदलण्यात आली आहे. यात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री म्हणून पाटी लावण्यात आली आहे.