महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्ली दरबारी दाखल झाले आहेत. फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. फडणवीसांसह भाजपचे राज्यातील चार नेते दिल्ली दौऱ्यावर आहेत.
‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्राकडे लक्ष देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस अमित शाह यांच्याकडे करणार आहेत. फडणवीस यांच्यासोबत साताऱ्यातील भाजप आमदार जयकुमार गोरे, माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि इंदापूरमधील भाजप नेते हर्षवर्धन पाटील आहेत.
फडणवीस हे दिल्ली दौऱ्यात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय अन्न आणि पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचीही भेट घेणार आहेत. भाजप नेत्यांची राज्यातील साखर उद्योगावर चर्चा होणार आहे. साखर कारखाने संकटात असल्याने मदत करावी, अशी मागणी नेते करणार आहेत.