मुंबई : महाराष्टाचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. यानंतर तिन्ही नव्या मंत्र्यांचं मंत्रालयात जंगी स्वागत करण्यात आले. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारची पहिली कॅबिनेट बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ज्या ज्या योजना महाराष्ट्रात राबवल्या आहेत. त्या पुढेही सुरूच राहणार आहेत. तसेच लाडकी बहीण योजनेचे २१०० रूपये करणार अशीही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागच्या अडीच वर्षाच राज्याने जी विकासाची गती पकडली आहे. तीच गती आता पुन्हा आम्ही पुढे नेणार आहे. आमच्या कामाची पद्धत तीच राहणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीपुर्वी जी आश्वासने दिली होती. ती पुर्ण करण्यासाठी आमचा प्रयत्न करणार आहोत. तसेच विरोधकांची संख्या कमी आहे, परंतु त्यांच्या संख्येचे मुल्यमापन करणार नाही. त्यांनी मांडलेले योग्य मुद्दे आम्ही विचारात घेऊ. असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन केले. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना शिंदे गटातील अनेक नेते देखील उपस्थित होते.
यातच सात ते आठ डिसेंबर दरम्यान आमदार आपली शपथ घेतील. तर येत्या ९ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात यावी, अशा आशायाचं पत्र आम्ही राज्यपालांकडे पाठवले आहे. तसेच हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वी आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार करू. असेही त्यांनी सांगितले.