जयसिंगपूर: पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी ही निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र आता निवडणूक होणार आणि यावेळी देखील कृष्णा सहकारी साखर कारखान्यात परिवर्तनाची लाट येणार की पुन्हा एकदा सहकार पॅनलचा कारखान्यावर दबदबा राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
जयसिंगपूर येथील शिवाय कोविड सेंटर मध्ये डॉ. सुरेश भोसले यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची पाठिंबा मिळवण्यासाठी भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान जयवंतराव सहकार पॅनलने सहा वर्षांच्या कारकिर्दीत केलेल्या प्रगतीचा लेखाजोखा राजू शेट्टी यांच्यासमोर मांडला आहे. सहा वर्षांमध्ये सरकारी उसाला ३०५० रुपये एवढा उच्चांकी दर दिला आहे. बोगस कामगारांना काढून टाकणे, वसंतदादा शुगर सोबत करार करत कृष्णा शक्ती संजीवक तयार केले आहे असे प्रतिपादन डॉ. सुरेश भोसले यांनी केले आहे.
कृष्णा सहकारी साखर कारखाना सध्या अत्यंत चांगल्या आर्थिक परिस्थितीमध्ये असल्याने डॉ. सुरेश भोसले यांचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी अभिनंदन केले आहे. डॉ. सुरेश भोसले यांनी ‘समृद्धीचा कृष्णा पॅटर्न’ ही पुस्तिका राजू शेट्टी यांना भेट स्वरूपात दिली आहे.राज्यातील इतर साखर कारखान्यांनी देखील कृष्णा साखर कारखान्यासारखे काम करावे अशी भावना राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली आहे. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासमवेत आनंदराव मोहिते, देवानंद पाटील, महेश खराडे, प्रकाश देसाई, भागवत जाधव आदी उपस्थित होते.