कराड: पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. . कोरोना महामारीच्या संकटकाळात निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी ही निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र आता निवडणूक होणार आणि यावेळी देखील कृष्णा सहकारी साखर कारखान्यात परिवर्तनाची लाट येणार की पुन्हा एकदा सहकार पॅनलचा कारखान्यावर दबदबा राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
वडगाव हवेली येथे कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक संपर्क दौऱ्यादरम्यान रयत पॅनलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते यांनी सत्ताधारी सहकार पॅनलवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. रयत संघर्ष मंचने आजपर्यंतच्या काळात सभासद हाच कारखान्याचा केंद्रबिंदू मानून काम केले आहे. कारखान्याच्या मार्फत शेतकरी सभासदांसाठी विविध योजना राबवून त्यांचे हित जोपासण्याचे काम रयत क्रांती संघर्ष मंचने जोपासले आहे आणि हे सर्व सभासदांना ठाऊक आहे. यामुळे यावेळी नक्कीच रयत पॅनलच्या पारड्यात मोठ्या प्रमाणावर मते पडणार यात शंका नाही.
अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनल सोबत मनोमिलन करण्यासाठी आम्ही यावेळी नक्कीच आशावादी आहोत आणि लवकरच मनोमिलन होईल असा संदेश देखील डॉ. इंद्रजित मोहिते यांनी दिला आहे. यावेळी डॉ. सुधीर जगताप यांनी मनोगत व्यक्त केले आहे आणि उपसरपंच जयवंत जगताप यांनी आभार मानले आहे. यावेळी माजी संचालक रघुनाथ कदम, उमेदवार डॉ. सुधीर जगताप, रामभाऊ जगताप, आनंदराव जगताप, प्रमोद पाटील, नितीन पाटील, सयाजी पाटील, रामचंद्र जगताप आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष अशीच लढत कारख्यान्यात होणार आहे. त्यापूर्वी डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते एकत्रित आण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुढे सरसावली आहे. डॉ. सुरेश भोसले पॅनलच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. दोन्ही मोहितेंच्या मनोमिलनासाठी नक्कीच उशीर झालेला आहे मात्र आता मनोमिलन अंतिम टप्प्यात आलेले आहे आणि एक ते दोन दिवसांत निर्णय होणार असे खात्रीलायक वृत्त कृष्णाकाठी आलेले आहे. दोन ते तीन जागा सोडल्या तर दोन्ही मोहितेंचे १००% एकत्रीकरण करण्यात नेत्यांना यश आले आहे.