नाशिक शहर आणि जिल्ह्यात कोरोना चा कहर सुरुच आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे आज (24 जुलै) नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने स्वतः पवार मैदानात उतरल्याची चर्चा आहे.
शरद पवार यांनी नाशिकमधील कोरोनास्थितीचा आढावा घेतला. आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह स्थानिक प्रशासनाने बैठक घेऊन शरद पवार आणि राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं सांगितलं
“राज्यातील 3000 हेल्थ ऑफिसर सेवेसाठी उपलब्ध करणार आहोत. सर्व ऑडिटर्सला एक एक हॉस्पिटलची जबाबदारी देण्यात येईल. ऑडिटर्सने तपासणी केल्यानंतरच बिल रुग्णांना दिल जाईल”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील 3000 हेल्थ ऑफिसर सेवेसाठी उपलब्ध करणार आहोत. खासगी रुग्णालये कोव्हिडची बिलं जास्त आकारतात अशा तक्रारी आहेत. त्याबाबत अत्यंत स्पष्ट सूचना आहेत, जे सरकारी ऑडिटर आहेत, या सर्व ऑडिटर्सला एक एक हॉस्पिटलची जबाबदारी देण्यात येईल. जे बिल हॉस्पिटल देईल ते आधी ऑडिटर्सकडे तपासणीसाठी जाईल. ऑडिटरने तपासल्यानंतर, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जी रुग्णालये ठरली आहेत, त्यातील उपचार मोफत होत आहेत की नाही, हे सगळं ऑडिटर तपासेल. त्यानंतर ते बिल रुग्ण आणि नातेवाईकांना दिलं जाईल. रिक्त जागांच्या बाबत मेरिटवर जागा भराव्यात आशा सूचना दिल्या आहेत. रिक्त जागांचा प्रश्न आज निकाली निघेल, असं राजेश टोपे म्हणाले.