चित्रपट निर्मात्या अभिनेत्री आणि दिग्दर्शक प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुण्यात प्रिया बेर्डे यांच्यासह अनेक कलाकार, तंत्रज्ञ यांचा पक्षप्रवेश झाला. शरद पवारांच्या कार्याने प्रभावित होऊन राष्ट्रवादीची निवड केल्याचं प्रिया बेर्डे म्हणाल्या.
प्रिया बेर्डे म्हणाल्या “आपल्या कलाकारांसाठी मला काम करायचे आहे. राजकारणात प्रवेशासाठी राष्ट्रवादीची निवड का केली, असा प्रश्न मला विचारला जातो. तर शरद पवार साहेबांना कलेची जाण आहे. त्यांना कलाकारांविषयी आदर आहे, कलाकारांची कदर आहे. त्यांची सांस्कृतिक जाण आम्हा कलाकारांना माहित आहे.”
तसेच प्रिया बेर्डे यांनी यावेळी बोलताना विधानपरिषेदबाबत देखील स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या,”“विधान परिषद वगैरे डोक्यात नाही. मला तळागाळात काम करायचे आहे. तालुके जिल्ह्यातून फिरायचे आहे. लोक कलावंत यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत. पक्षश्रेष्ठी यांनी विचार केला, तर बघू”
प्रिया बेर्डे यांची राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती होणार आहे. त्या सध्या पुण्यातच असून लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचा कारभार चालवत आहेत. त्यामुळे त्यातूनच त्या नव्या कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले जात आहे.