पुणे : मराठा आरक्षणाचा तिढा कायम असतानाच आता आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणासाठी येत्या ३१ मे रोजी धनगर समाजाने जागर करावा, असं आवाहन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. त्यामुळे आगामी काळात धनगर आरक्षणाचा प्रश्नही पेटणार असल्याचे संकेत मिळत असून सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवरून हे आवाहन केलं आहे. पडळकर यांनी पारंपारिक वेशात आवाहन करतानाचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरवही केला. ३१ मे रोजी धनगर समाजाने आरक्षणाचा जागर करावा. झोपी गेलेल्या सरकारला जागं करावं, असं आवाहन पडळकर यांनी केलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मी चौंडीला जाऊन दर्शन घेणार आहे. हा जयंतीचा कार्यक्रम लाईव्ह दाखवणार आहे. कोरोनामुळे इतरांना चौंडीला येता येणार नाही. त्यामुळे सर्वांनी घरीच राहून अहिल्यादेवींच्या फोटोचं पूजन करावं. अहिल्यादेवींचं दर्शन घेऊन मी धनगर आरक्षणाचा विसर पडलेल्या सरकारला जागं करण्याचा निर्धार करणार आहे. कोव्हिड काळात एकत्र येणं शक्य नसल्याने समाज बांधवांनी सोशल मीडियाद्वारे एकत्रित येऊन या सरकारचा निषेध नोंदवावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
३१ मे रोजी यंदा कोविडमुळे आपल्याला घरातूनच सर्वांनी आपल्या धनगरी पोशाखात #अहिल्यादेवींना वंदन करून जयंती उत्सव साजरा करायचा आहे. मी चौंडी येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवींना वंदन करताना फेसबुक लाईव्हद्वारे आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहे. pic.twitter.com/jzTXwRUjwm
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) May 25, 2021
सर्वांनी पारंपारिक वेशभूषा करत या जागरमध्ये सामिल व्हावं. या सरकारला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून द्या. सरकारला हादरा बसला पाहिजे. आपल्या एक कोटी लोकांची ताकद काय आहे, हे सरकारला दाखवून द्या, असं आवाहन करतानाच राज्यातील महाविकास आघाडी सरकार धनगर समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.