महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७५ वर्षांच्या होत्या.अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले आहे.
शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये मनोहर जोशी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले. ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री तर ठरलेच, पण राज्याचे पहिले बिगर-काँग्रेसी मुख्यमंत्रीही ठरले होते. मनोहर जोशी यांच्या बऱ्या-वाईट काळात अनघा जोशी यांनी पतीला खंबीर साथ दिल्याचे बोलले जाते.
अनघा जोशी यांचा जन्म 2 जानेवारी 1945 रोजी झाला. मनोहर जोशी यांच्याशी 14 मे 1964 रोजी अनघा यांचा विवाह झाला होता.अनघा जोशी यांच्या पश्चात पती मनोहर जोशी, पुत्र उन्मेष जोशी, अस्मिता आणि नम्रता या दोन कन्या, जावई गिरीश व्यास असा परिवार आहे.