पुणे महानगर पालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पीएमआरडीएचे विक्रम कुमार यांची आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पुण्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याने शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र भाजप नेते आणि खासदार गिरीश बापट यांनी या निर्णयाचा विरोध करत तीव्र नाराजी व्यक्त केली
पुण्यातील कोरोना विरोधातील लढाई निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. अशा परिस्थितीत पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची अचानक बदली करण्यात आली. या चुकीच्या निर्णयाचा मी निषेध करतो, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केली. तसेच या विरोधात गरज पडल्यास आंदोलनाचाही इशारा दिला आहे.
गिरीश बापट म्हणाले, “पालिका आयुक्त शेखर गायकवाड हे चांगलं काम करत होते. त्यामुळं या चुकीच्या निर्णयाचा मी निषेध करतो. त्याचबरोबर पुणेकरांच्या जीवाशी खेळणाऱ्यांचाही निषेध करतो. यासंदर्भात वेळ पडल्यास आंदोलनाचाही मार्ग स्विकारु.” आपल्या हातात सत्ता असून कोरोना संपल्यानंतर आपण मनमानी कारभार करु शकता, असा टोलाही त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता लगावला.
मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली आश्चर्यजनक आहे. एकतर्फी लॉकडाऊन आणि त्यानंतर आयुक्तांची बदली करण्यात आलीय. एकीकड राजकारण करु नका, असं म्हणतात. मात्र, आता कोण राजकारण करतोय हे पुणेकरांना दिसत असल्याचं म्हणत बापट यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला.