पुण्याचे माजी पालकमंत्री तथा खासदार गिरीश बापट यांची संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. संसदीय कामकाजाचा व्यापक अनुभव, ज्येष्ठता आणि सरकारी कामकाजाची बारीक माहिती बापट यांना आहे. यामुळे त्यांची या प्रमुख समितीच्या प्रमुखपदी लोकसभा अध्यक्षांनी नियुक्ती केली.
लोकसभेत अंदाज समिती आणि लोकलेखा समिती या अत्यंत महत्त्वाच्या समित्या असतात. त्यामुळे गिरीश बापट यांना केंद्रीय राज्य मंत्रिपदाचा दर्जा मिळाला असून संसदेत त्यासाठी कार्यालय मिळाले आहे. अनेक वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री या समितीचे सदस्य आहेत.
दरम्यान, गिरीश बापट हे लोकसभेच्या अर्थसंकल्प समितीचेही अध्यक्ष आहेत. ही समिती लोकसभेच्या खर्चाचे नियंत्रण करते. त्याशिवाय ते संसदेच्या अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक कल्याण समितीचे सदस्य आहेत.