पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील औद्योगिक वापराचा ऑक्सिजनचा पुरवठा काही प्रमाणात का तरी उद्योगांसाठी सुरळीत करा, असा आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. या बाबतचा औपचारिक निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरोना काळात औद्योगिक कंपन्यांमधील ऑक्सिजन वापरावर निर्बंध घालण्यात आले होते. कोरोना रुग्णालयांमध्ये औद्योगिक कंपनींमधील सुमारे ८० टक्के वापरला जात होता. मात्र, आता कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. तसेच, ऑक्सिजनची मागणीही कमी झाली आहे. त्यामुळे औद्योगिक कंपन्यांना ऑक्सिजन पुरवठा पुर्ववत करावा, अशी मागणी काही दिवसांपुर्वी भाजपा शहराध्यथ तथा आमदार महेश लांडगे यांनी केली होती.
कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्य सरकारने महाराष्ट्रासह पिंपरी चिंचवडमधील लउद्योगांत तयार होणारा ऑक्सिजन ताब्यात घेतला आहे. तो ऑक्सिजन रुग्णालयांना देण्यात येत आहे. कोरोनाचे रुग्ण जास्त होते तेव्हा ते प्रती दिन सुमारे ४१७ मेट्रिक टनांपर्यंत ऑक्सिजन पुणे विभागात उपलब्ध होत होता. परंतु, आता मागणी घटल्यामुळे इतर राज्यांतून आणि जिल्ह्यांतून ऑक्सिजन आयात करणे जिल्हा प्रशासनाने बंद केले आहे. पुणे परिसरात सुमारे ३०० मेट्रिक टन ऑक्सिजन दररोज तयार होत आहे. तर वैद्यकीय क्षेत्राची मागणी सुमारे १९५ मेट्रिक टन प्रती दिवसांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे उद्योगांना ऑक्सिजन द्यावा, अशी मागणी आमदार महेश लांडगेंसह औद्योगिक कंपन्याकडून जोर धरू लागली.
ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे सुरू असलेल्या उद्योगांपैकी सुमारे ५० टक्के उद्योग बंद पडले आहेत. तसेच अभियांत्रिकी, ऑटॉमोबाईल क्षेत्रालाही ऑक्सिजनची गरज आहे. पिंपरी चिंचवडमध्येही सुमारे ५० टक्के कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे उद्योग क्षेत्र अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाची आढावा बैठक शुक्रवारी (दि. २८ मे) झाली.
या बैठकीत ऑक्सिजनअभावी उद्योग अडचणीत सापडल्याच्या विषयावर चर्चा झाली. त्यावेळी उद्योगांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा आता सुरू करायला हवी, असा प्रस्ताव उद्योग अधिकाऱ्यांनी मांडला. त्यावर पवार यांनी आढावा घेतला. तेव्हा वैद्यकीय क्षेत्राची मागणी १९५ मेट्रिक टनापर्यंत घटल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यावर पालकमंत्री अजित पवार यांनी टप्प्याटप्प्याने ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करता येईल, असे सांगितले. पहिल्या टप्प्यात उद्योगांसाठी प्रती दिन ऑक्सिजन निर्मितीमधील १० ते २० टक्के ऑक्सिजन देता येईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच या बाबतचा निर्णय सोमवार किंवा मंगळवारी जाहीर करू, असे सांगितले.
ऑक्सिजनअभावी उत्पादनावर परिणाम…
औद्योगिक कंपन्यांना लागणारा ऑक्सिजन पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्यामुळे उद्योगांच्या उत्पादकतेवर परिणाम होत आहे. पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरात सुक्ष्म, लघु व मध्यम अशा ३५ हजाराहून अधिक कंपन्यांची ऑक्सिजनसाठी परवड होत आहे. वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा आहेत. परंतु, मेडिकल ऑक्सिजनची मागणी झपाट्याने घटत असल्यामुळे आता उद्योगांना पुरवठा करणेसुद्धा महत्त्वाचे आहे. त्यामुळे मेडिकल ऑक्सिजनची घटलेली मागणी लक्षात घेता उद्योगांना आर्थिक पेचातून बाहेर काढण्यासाठी उद्योग ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करावा, असी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.