गेल्या पाच दिवसात सोन्याचा भाव तब्बल सोडतीन हजाराने वधारला आहे. सोन्याने आज मागील सर्व रेकॉर्ड मोडत सराफा बाजारात 56 हजार 191 रुपये प्रतितोळा इतका उचांक गाठला. तर चांदीचे भावही गगनाला भिडले आहेत. आज चांदीचा भाव 73 हजार प्रतिकिलोवर पोहोचला आहे (Gold Price Today).
जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोव्हिड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशातीलच नाही तर आंतराष्ट्रीय स्तरावर आर्थिक संकट आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीतही वाढ दिसून आली आहे. गेल्या पाच दिवसात सोन्याच्या भावात साडेतीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. 3 ऑगस्टला सोन्याचा भाव 53 हजार 717 रुपये प्रतितोळा होता. 4 ऑगस्टला सोन्याचा भाव वाढून 54 हजार 551 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचला. तर, 5 ऑगस्टला सोन्याचा भाव 55 हजार 098 रुपये प्रतितोळा होता. 6 ऑगस्टला सोन्याचा भाव 55 हजार 845 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचला. तर, 7 ऑगस्टला सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडत 56 हजार 191 रुपये प्रतितोळा भाव गाठला.