मुंबई – अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फेकूचंद पडळकरांसारखे नेते विधानसभेच्या दारात पारंपरिक ढोल वाजवून सरकारविरोधात नाचगाणे, घोषणाबाजी करीत होते. त्या ढोलवादनाचे थेट प्रसारण सर्व वृत्तवाहिन्या दाखवत होत्या. हुकूमशाही किंवा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकलं असतं, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र सामनातून गोपीचंद पडळकर यांच्यावर करण्यात आली आहे.
यावर आता पडळकर यांनी संजय राऊत यांना सडेतोड उत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केल्याचा घणाघाती आरोप पडळकर यांनी केला आहे. सामनाच्या अग्रलेखात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख फेकुचंद पडळकर असा करण्यात आला आहे. त्यावरुन पडळकर यांनी शिवसेना खासदार आणि सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पडळकर यांनी खास धनगरी पेहराव करत ढोल वाजवून आंदोलन केलं होतं. त्यावरुन सामनाच्या अग्रलेखात पडळकरांवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. त्याबाबत विचारलं असता पडळकर यांनी संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सामना वृत्तपत्र आपण वाचत नाही. हा सामना आता जुना सामना राहिला नाही तर व्यापारी सामना झाला आहे. बाळासाहेबांच्या काळातील सामना वेगळा होता, अशा शब्दात पडळकरांनी राऊतांवर जोरदार टीका केलीय.